केरळसाठी परकीय देशांची मदत स्वीकारण्यास भारताचा नकार   

403

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – केरळमधील भीषण पुरानंतर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी देशातील अनेक  राज्यांनी पुढाकार घेतला आहे. त्याशिवाय अनेक देशांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र,  मदत देऊ इच्छिणाऱ्या या देशांचे आभार मानत भारताने त्यांची मदत नम्रपणे नाकारली आहे.

पुरानंतर युएई, कतार आणि मालदीव या देशांनी केरळमध्ये सुरू असलेल्या मदत आणि पुनर्वसन कार्यासाठी आर्थिक मदत देऊ केली होती. भारताने ही मदत नम्रपण नाकारली आहे. भारत स्वत:च्याच साधनसामग्रीचा वापर केरळच्या पुनर्वसनासाठी करणार आहे. मात्र, परकीय देशांची मदत नाकारतानाच केरळमधील पूरग्रस्तांना खासगीरित्या सुरू असलेला मदतीचा ओघ मात्र सुरूच राहणार आहे.

युएईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी केरळला ७०० कोटी रुपयांची मदत देऊ केली  होती. मुख्यमंत्री पीनरयी विजयन यांनी त्यांचे आभारही मानले. मालदीवने केरळसाठी ५० हजार डॉलर्सची मदत जाहीर केली. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी देखील जिनिव्हातल्या संयुक्त राष्ट्रसंघाकडे मदत देण्याची मागणी केली होती. मात्र, कोणतीही विदेशी मदत स्वीकारणार नसल्याचे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.