केरळमध्ये मोदीकडून पूर परिस्थितीची हवाई पाहणी; ५०० कोटींची मदत जाहीर

260

तिरूअनंतपुरम, दि. १८ (पीसीबी) –  अतिवृष्टी आणि नद्यांना आलेला महापूर यामुळे केरळमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या शंभर वर्षातील हा केरळमधील सर्वात भीषण पूर आहे, असे केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी म्हटले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवारी)  मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासोबत पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली.   पूरातील मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये तर, गंभीर जखमींना ५० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची  मोदी यांनी घोषणा केली. तसेच पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी केरळला ५०० कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. याआधी राजनाथसिंह यांनी केरळला १०० कोटींची मदत जाहिर केली होती.

केरळमध्ये महापूरात आतापर्यंत ३२४ लोकांचा मृत्यू झाला आहे. २ लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. याआधी १९२४ मध्ये केरळमध्ये पावसामुळे जलसंकट आले होते.  केरळमधील सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक भाग अद्यापही पाण्याखाली आहेत. रस्ते बंद झाले असून रेल्वे आणि हवाई सेवेलाही फटका बसला आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडयांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. कोची विमानतळ बंद आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलाकडून युध्दपातळीवर  बचावकार्य सुरू आहे.

८२,४४२ लोकांची शुक्रवारी सुटका करण्यात आली. रेल्वेने राज्यात दीड लाख पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले.  दिल्ली सरकारकडून केरळला १० कोटींची मदत घोषित केली जाण्याची शक्यता आहे. नौदलाने आयएनएस दीपक ही युद्धनौका मुंबईहून कोचीला रवाना केली आहे. यात पिण्याचे आठ लाख लिटर पाणी आहे. १९ ऑगस्टला आयएनएस दीपक कोचीला पोहोचेल.