केरळमध्ये मुसळधार पावसाचा कहर; २२ जणांचा मृत्यू

115

तिरुवनंतपुरम, दि. ९ (पीसीबी) – केरळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज (गुरूवार) दिवसभर मुसळधार पाऊस सुरू असून विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत किमान २२ जणांचा मृत्यू झाला आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे, असे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले.

इडुक्की जिल्ह्यात ११, मलप्पुरममध्ये ५, वायनाडमध्ये ३, कन्नूरमध्ये २ तर कोझिकोडमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. इडुक्की येथे दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. इडुक्की धरणातील पाणीसाठ्याने २६ वर्षांतील सर्वोच्च पातळी गाठली असून आज ६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.  यामुळे धरणक्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पूरस्थिती लक्षात घेता लष्कर, नौदल, तटरक्षक दल आणि एनडीआरएफ दलाला पाचारण केले आहे.    एनडीआरएफची तीन पथके तातडीने केरळमध्ये दाखल झाली आहेत. आणखी ८ पथके येथे दाखल होण्याची शक्यता आहे. पावसामुळे नेहरू चषक बोटिंग स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.