केरळमध्ये पावसाचा हाहाकार; ५४ हजार नागरिक बेघर, २९ जणांचा मृत्यू

328

तिरूअनंतपुरम्, दि. ११ (पीसीबी) – केरळमध्ये मुसळधार पावसाने  अर्ध राज्य जलमय झाले आहे. अनेक ठिकाणी महामार्गाचे काही भाग खचले आहेत. अनेक घरांची पडझड झाली असून अनेक घरे वाहून गेली आहेत. त्यामुळे ५४ हजार लोकांना बेघर होण्याची वेळ आली आहे. तर २९ जणांचा मृत्यू झाला आहे. इडुक्की व आजूबाजूच्या जिल्हय़ांना धोक्याचा इशारा  दिला आहे. इडुक्की धरणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवण्यात येत आहे. तर काही ठिकाणचे  रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

सात जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. तिेथे लष्कराच्या पाच तुकड्या तैनात करण्यात केल्या आहेत. अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी बचावकार्य  लष्कराने सुरू केले आहे.  ८ ऑगस्टपासून सुरु असलेल्या पावसामुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.  २५ जणांचा भूस्खलनामुळे तर चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. ५३ हजार ५०१ लोकांची मदत छावण्यांमध्ये राहण्याची सोय केली आहे.

केरळच्या उत्तर भागात लष्कर तैनात करण्यात केले असून, तेथे कोझीकोड व वायनाड येथे अडकून पडलेल्या लोकांना सोडवण्यासाठी लहान पूल बांधले जात आहेत. भारतीय नौदलाने दक्षिण नौदल कमांडला सतर्कतेचा आदेश दिला आहे. पेरियार नदीची पातळी वाढली आहे. वेलिंग्टन बेटे व कोची बॅकवॉटर्सचा काही भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

मुन्नार येथे प्लम जुडी रिसॉर्टवर ३० पर्यटक अडकले असून त्यात परदेशी लोकांचा समावेश आहे. त्यांना हलवण्यासाठी लष्कराची मदत घेतली जात आहे, असे पर्यटनमंत्री कडकमपल्ली सुरेंद्रन यांनी सांगितले. त्यांना केरळ पर्यटन महामंडळाच्या निवासात हलवण्यात आले आहे. पेरियार व चेरुथोनी नद्यांच्या काठावर राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. राज्यातील २४ धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.