केतकी चितळेच्या विरोधात सुजात आंबेडकर यांचाही संताप..

83

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सुजात यांनी केतकीवर टीका करताना शरद पवार हे जगभरातल्या कॅन्सर पेशंट्ससाठी प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व असल्याचं म्हटलंय.

“अभिनेत्री केतकी चितळेने केलेली पोस्ट अत्यंत घाणेरडी होती,” अशी प्रतिक्रिया सुजात यांनी दिली आहे. कल्याणमध्ये मूकनायक ते प्रबुद्ध भारत कार्यक्रमात सुजात सहभागी झाले होते. यावेळेस बोलताना त्यांनी केतकी चितळे प्रकरणावर भाष्य केलं. “सोशल मीडियाचा वापर सर्वांनी लक्षपूर्वक करण्याची आवश्यकता आहे. सध्या जे काही ट्रोलिंग होतं, त्यामुळं नेत्यांना मानसिक आरोग्याचाही त्रास होऊ शकतो. केतकी चितळेचं वक्तव्य अतिशय घाणेरडं आणि चुकीचं असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करायचा असेल, तर धोरणांवर, भूमिकांवर, राजकारणावर टीका करा,” असं सुजात म्हणाले आहेत.