कॅन्सरग्रस्त पतीसोबत शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने पत्नीची हत्या

139

दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – कॅन्सरग्रस्त पतीसोबत पत्नीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना दिल्लीतील नोएडा भागात घडली.

अजय उर्फ महेश असे या आरोपी पतीचे नाव आहे. त्याला तोंडाचा  कॅन्सर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडात राहणाऱ्या अजय उर्फ महेशचे सलूनचे दुकान होते. अजयचे १७ वर्षांपूर्वी ममताशी लग्न झाले होते. या दाम्पत्याला १६ वर्षांची मुलगी आणि ८ वर्षांचा मुलगा अशी दोन मुले आहेत. अजयला गेल्या वर्षी कर्करोगाने ग्रासले. गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून त्याची प्रकृती खालावली होती. २० दिवसांपूर्वी ममता नोएडात भावाच्या घरी राहायला गेली. तिथे नोकरी करुन पतीच्या उपचारासाठी पैसे गोळा करण्याचा तिचा प्रयत्न होता. गेल्या काही महिन्यांमध्ये ममताने अजयशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला होता.

तोंडाचा कर्करोग असल्याने तिने नकार दिल्याचे अजयचे म्हणणे आहे. ‘ममताने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने अजयच्या मनात संशय होता. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे त्याला वाटत होते. याच संशयातून त्याने ममताची हत्या केली’, असा आरोप ममताच्या नातेवाईकांनी केला. ११ जुलै रोजी अजय ममताचा भाऊ राहुल कुमार यांच्या घरी गेला. तिथे अजयने ममतावर चाकूने वार केले आणि पळ काढला. पोलिसांनी त्याला रविवारी अटक केली.