“कृषी कायदे रद्द झाल्याने शेतकरी जिंकला; म्हणून वाटतंय देशाला आज स्वातंत्र्य मिळालं”: राऊतांचा कंगना आणि विक्रम गोखलेंना टोला

71

नाशिक, दि.२० (पीसीबी) : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या विजयाचा दावा केलाय. नाशिकमध्ये महापालिका निवडणूक आहे. 100 च्या खाली नगरसेवक देणार नाही असं इथले नेते सांगतात. जेवढे द्याल तेवढे कमीच आहेत. इथला प्रत्येक माणूस 10 नगरसेवकांचा मालक आहे. आपली सेन्च्यूरी नक्की आहे, असा विश्वास राऊत यांनी आज नाशिकमध्ये व्यक्त केलाय.

नाशिकमध्ये शिवसैनिकांनी अनेकांना जमिनीवर आणण्याची आवश्यकता आहे. या पेक्षाही मोठा कार्यक्रम झाला असता. पण पोलिसांनी परवानगी दिली नाही. अमरावतीमध्ये काही झालं म्हणून नाशिकमध्ये मोठा कार्यक्रम घ्यायला परवानगी दिली नाही. अमरावतीत जे झालं ते नाशिकमध्ये कधीच होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. इथे वॉर्डात मोदी उभे राहिले तरी डिजी तुन्ही जिंकून येणार, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे. तसंच पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकरी जिंकला, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. शेतकरी जिंकला म्हणून मलाही वाटतं की देशाला आज स्वातंत्र्य मिळालं. आज स्वातंत्र्य मिळालं असं फक्त कंगना किंवा विक्रम गोखले यांनाच वाटलं पाहिजे का? देशात आज चले जावं सारखी परिस्थिती आहे. महाराष्ट्राला दोन वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळालं आहे, अशी टीकाही राऊत यांनी केलीय.

कृषी कायदे मागे घेण्याच्या मोदींच्या घोषणेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खंत व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत व्यक्त केली आहे. पाटील यांच्या वक्तव्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केलीय. माझ्या शोक संदेश चंद्रकांत पाटील यांना पाठवेल. त्यांच्यासाठी हा शोक असेल तर त्यासाठी आपण शोकसभा घेऊ. देश उत्सव साजरा करत असेल तेव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

राऊत यांनी कृषी कायद्यावरुन भाजपवर जोरदार टीका केलीय. दीड वर्षांपासून शेतकरी तणाव, दबावात होता. त्या जोखडातून तो बाहेर निघाला आहे. विक्रम गोखले, कंना रनौत यांच्या स्वातंत्र्याची व्याख्या वेगळी असेल. शेतकऱ्यांना मालक नव्हे गुलाम करण्याचा हा कायदा होता. शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करणारा हा कायदा होता. गाड्या घातल्या, गुंड पाठवले. मात्र, शेतकरी हटला नाही. हे स्वातंत्र्य आहे. हे लढवून मिळालं आहे, भीकेतून नाही. जालियनवाला बागेत ईस्ट इंडिया कंपनीने गोळ्या घातल्या. तसंच शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय.

WhatsAppShare