कुरुळीत विजेचा धक्का लागून टेक्नेशियनचा मृत्यू; ठेकेदाराविरोधात गुन्हा

389

चाकण, दि. ३ (पीसीबी) – सुरक्षा साधने न पुरवता खाबावरील विजेचे काम करुन घेत असताना विजेचा जबरदस्त झटका लागून टेक्नेशियन खांबावरुन खाली पडला. या घटनेत गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सोमवार (दि.२) सकाळी पावणेदहाच्या सुमारास स्पाईसर चौक ते निघोजे रस्त्यावरील एच.टी. लाईनच्या खांबाजवळ घडली.

अशोक संभाजी सिंधीकुमठे असे मयत टेक्नेशियनचे नाव आहे. याप्रकरणी निलेश भागवत काचे यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ठेकेदार शैलेश ठाकुर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक हे टेक्नेशियन म्हणून निलेश याच्याकडे कामाला होते. सोमवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास ते कुरुळी येथील स्पाईसर चौक ते निघोजे रस्त्यावरील एच.टी. लाईनच्या खांबावर विजेचे काम करत होते. यावेळी विजेचा जबरदस्त झटका लागून ते खांबावरुन खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. कामाच्या वेळी ठेकेदार निलेश याने अशोक यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा साधने पुरवली नव्हती. यामुळे निलेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिस उपनिरीक्षक एस.एस सुर्यवंशी तपास करत आहेत.

WhatsAppShare