कुमार विश्वकरंडक हॉकी – जर्मनीकडून भारताचे स्वप्न उध्वस्त

0
396

भुवनेश्वर, दि. ०४ (पीसीबी) – सहावेळच्या विजेत्या जर्मनीने यजमान भारताचे कुमार विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद राखण्याचे स्वप्न उध्वस्त केले. परिपूर्ण खेळाचे प्रदर्शन करताना त्यांनी भारताचा ४-२ असा पराभव केला. अंतिम फेरीत आता जर्मनीची गाठ अर्जेंटिनाशी पडणार आहे. त्यांनी फ्रान्सचा शूट आऊटमध्ये ४-३ असा पराभव केला. यंदाच्या स्पर्धेचे आगळे वैशिष्ट्य म्हणजे एकाच गटातील संघ पदकासाठी खेळणार आहे. विजेतेपदासाठी खेळणारे जर्मनी-अर्जेंटिना आणि ब्रॉंझपदकासाठी लढणारे फ्रान्स-भारत हे चारही संघ एकाच गटातील आहेत.

भारताने २०१६ मध्ये लखनौत विजेतेपद मिळविले होते. पण, या वेळी ते राखण्याच्या दडपणाखाळी कुठे तरी भारतीय खेळाडू आपला खेळ हरवून बसले होते. दुसरीकडे जर्मनीने आपल्या लौकिकास साजेसा खेळ केला. त्यांनी भारतीय संघाचा केलेला अभ्यास महत्वाचा होता. भारतीय संघात एक नाही, तर सहा खेळाडू पेनल्टी कॉर्नवर गोवल करू शकतात ही ताकद त्यांनी ओळखली आणि त्यांना जास्त पेनल्टी कॉर्नर मिळणार नाहीत याची त्यांनी चोख काळजी घेतली. त्यामुळे भारतीय खेळाडू दडपणाखाली गेले आणि त्यांचा खेळ विस्कळीत झाला.

पूर्वार्धातील खेळात तर ते जर्मनीचा सामनाच करू शकले नाहीत. एका गोलचे भारताला समाधान लाभले खरे, पण तोवर त्यांनी चार गोल स्विकारले होते. उत्तरार्धात भारताने सामन्यात येण्याचा जरुर प्रयत्न केला. पण, त्यांना जर्मनीचा बचाव भेदण्याची संधीच मिळाली नाही. त्यांनी उजव्या बाजूने अधिक आक्रमणे केली. ती ते पूर्ण करू शकले नाहीत. उत्तरार्धात त्यांनी गोल करण्याच्या दोन संधी दवडल्या याची सल त्यांना निश्चित राहिल. दुसरीकडे जर्मनीने अगदी नियोजनपूर्वक चाली रचल्या आणि त्यांनी भारतीयांना मुख्यत्वे गोलकक्षाच्या जवळ चांगल्या पद्धतीने रोखले. भारतीय या झालेल्या कोंडीच्या दडपणातून कधीच बाहेर पडू शकले नाहीत.

जर्मनीकडून एरिक क्लेईनेईल (१५वे), अॅरॉन फ्लॅटन (२१वे ), हॅन्नेस मुल्लेर (२४वे) आणि ख्रिस्तोफर कुट्टेर (२५वे मिनिट) यांनी गोल केले. भारताकडून उत्तमसिंगने २५व्या, तर बॉबी सिंगने ६०व्या मिनिटाला गोल केला.