कुमार जागतिक नेमबाजी – मुलींना स्किटप्रकारात सांघिक सुवर्ण

65

लिमा, दि.०२ (पीसीबी) : भारतीय मुलींनी कुमार गटाच्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. स्किटप्रकारात त्यांनी सांघिक सुवर्णपदक मिळविले. मुलांना ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले.

मुलींच्या संघात अरीबा खान, रिझा धिल्लॉं, गानेमत शेखॉन या तिघींचा समावेश होता. अंतिम फेरीत त्यांच्यासमोर इटलीच्या दामियाना पाओलासी, सारा बोनगिनी आणि गिआडा लोंघी यांचे आव्हान होते. त्यांनी एकतर्फी वर्चस्व राखत ६-० असा विजय मिळविला.

मुलांच्या विभागात राजवीर गिल, आयुष रुद्राजु आणि अभय सिंग धिल्लॉं यांचा समावेश होता. त्यांनी तुर्कीच्या अली अर्बासी, अहमत बारन आणि मुहमेत सेहुन यांचा ६-० असा पराभव केला.

यापू्र्वी, मुलींच्या विभागात शेखॉन हिने याच क्रीडा प्रकारात वैयक्तिक रौप्यपदक मिळविले. तिने यावर्षी दिल्ली येथे झालेल्या वरिष्ठ विश्वकरंडक स्पर्धेतही पदकाची कमाई केली होती. या वेळी तिला अमेरिकेच्या अलिशा लिन हिच्याकडून शूट-ऑफ मध्ये पराभव पत्करावा लागला.

स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन ब्रॉंझ अशी एकूण सात पदके मिळविली आहेत. अमेरिका तीन सुवर्णपदकांसह सात पदके मिळवून आघाडीवर आहेत.

WhatsAppShare