कुदळवाडीतून दुचाकी चोरास अटक; सव्वा लाखाच्या चार दुचाक्या जप्त

334

भोसरी, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने एका मोटारसायकल चोराला अटक केली असून त्याच्याकडून एकूण १ लाख ३० हजार रुपयांच्या चार दुचाक्या जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे पिंपरी, भोसरी एमआयडीसी  पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक आणि निगडी पोलिस ठाण्यातील दोन असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

विशाल मारुती चव्हाण (वय ३२, रा. पाटीलनगर, राम मंदिराशेजारी, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या अट्टल चोराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात वाढलेल्या वाहनचोरीवर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेचे एक पथक आज (शुक्रवारी) सकाळी चिखली परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी कुदळवाडी येथील चौधरी वजन काट्यासमोर विशाल हा दुचाकीस्वार संशयितरित्या फिरत असताना पोलिस हवालदार अप्पा कारकुड आणि पोलीस नाईक सुरेंद्र यांना आढळून आला. त्यांनी विशालला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या दुचाकीबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरून संशय बळावल्याने त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने चार दुचाकी चोरल्याचे कबूल केले.  विशाल याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एकूण १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उप आयुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली मरळे, पोलीस हवालदार अप्पासाहेब कारकूड, प्रमोद वेताळ, पोलीस नाईक अमित गायकवाड, संतोष बर्गे, तानाजी गाडे, सुरेंद्र आढाव, किरण चोरगे, प्रदीप गाडे यांच्या पथकाने केली.