कुख्यात रावण गँगच्या 4 गुंडाना अटक

52

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलिसांना पुण्यातील कुख्यात रावण गँगच्या 4 गुंडाना अटक करण्यात यश आले आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हा शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. सुरज खपाले, हृतिक उर्फ मुंग्या रोकडे, सचिन गायकवाड, अक्षय चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता.शिवाय या आरोपींच्या विरोधात मोक्काअंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.

या चौघांसोबतच आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गोळीबाराचे 2 गुन्हे दाखल असलेला आरोपी अनिकेत उर्फ विकी राजू जाधव यालाही पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलं. त्याच्या विरोधात जळगाव पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हा दाखल होता. मात्र त्यानंतर तो फरार होता. अनिकेतला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून 2 पिस्तुल 5 काडतुस जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

रावण गँगच्या चौघांच्या विरोधात चिखली पोलिस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यांच्या विरोधात मोक्कांतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर हे गुन्हेगार फरार झाले होते. मागील अनेक दिवस या आरोपींचा तपास सुरू होता. पोलिसांना हे आरोपी कराड तालुक्यातील घारेवाडी गावात लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन या आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

मागील अनेक दिवसांपासून रावण गँगच्या या 5 आरोपींचा तपास पोलिस करत होते. परंतु पोलिसांना त्यात यश मिळत नव्हते. गुंडा विरोधी पथकाने या आरोपींचा महाबळेश्वर, गोवा, कराड याठिकाणी जाऊनही शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रावण गँगमधील हे आरोपी पोलिसांच्या हातात सापडत नव्हते. अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांना या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे.

WhatsAppShare