किराणा सामान उधार न दिल्याने दुकानात तोडफोड करत रोकड पळवली

222

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – किराणा सामान उधार न दिल्याने तिघांनी किराणा दुकानातील अंडी आणि इतर किराणा मालाची तोडफोड व नासधूस केली. त्यानंतर दुकानाच्या गल्ल्यातून आणि एका व्यक्तीच्या खिशातून हजारो रुपये जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 10) सायंकाळी सहा आणि बुधवारी (दि. 12) रात्री नऊ वाजता लांडेवाडी भोसरी येथे घडली.

मुन्ना तिवारी (वय 27), शिवम पांडे (वय 25), रमजान (वय अंदाजे 28) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विकास लादूराम चौधरी (वय 27, रा. भोसरी गावठाण) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे लांडेवाडी येथे रामदेव सुपर मार्केट नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. फिर्यादी यांनी आरोपींना किराणा सामान उधार दिले नाही. त्या कारणावरून आरोपींनी चौधरी यांच्या दुकानात तोडफोड केली. अंडी आणि इतर किराणा सामानाचे नुकसान केले. दुकानाच्या गल्ल्यातील 1500 रुपये रोख रक्कम आणि अशोक चौधरी यांच्या खिशातून पाच हजार रुपये रोख रक्कम आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतली.

फिर्यादी आणि दुर्गाराम चौधरी यांना आरोपींनी दगड फेकून मारले. अशोक चौधरी यांच्याशी झटापट केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्मभूषण गायकवाड तपास करीत आहेत.