किरण सुर्यवंशी हत्याप्रकरणात गँगस्टर बाळू वाघेरेसह ७ जणांची निर्दोष सुटका

243

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – टोळी युध्दातून प्रतिस्पर्धी टोळीच्या प्रमुखाच्या साथीदाराचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गँगस्टर बाळू वाघेरेसह इतर ७ जणांची मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (दि. ४) निर्दोष सुटका केली. बाळू वाघेरे याने साथीदारांच्या मदतीने राकेश भरणे याचा साथीदार पिंट्या उर्फ किरण सुर्यवंशी याचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. ही घटना सप्टेंबर २००७ मध्ये घडली होती. या प्रकरणी जानेवारी २०१३ मध्ये बाळू वाघेरेसह इतर ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

बाळू बबनराव वाघेरे (रा.पिंपरी) दिलीप नामदेव भरणे (रा.माण, मुळशी) जयनाथ सुरेश फडतारे (कसबापेठ) सतीश श्रीरंग जाधव (रा. उरळीकांचन) बबन प्रकाश रणवरे (रा.बाणेर) संजय गोपाळ शिंदे (रा. पिंपरी) सुधीर सोपान क्षीरसागर(रा. कसबा पेठ) अशी निर्दोष सुटका करण्यात आलेल्यांची नांवे आहेत. प्रशांत भीमराव गायकवाड (रा. खडकी) याने याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पिंपरी -चिंचवड परिसरात भरणे आणि वाघेरे या टोळ्यांमध्ये सतत संघर्ष सुरू होता. यातून गुंड अंकुश सुर्वे याच्या खुनातील आरोपी राकेश भरणे याला न्यायालयीन कामात मदत करत असल्याच्या रागातून किरण सुर्यवंशी याचे अपहरण करून खून करण्यात आला होता. मुळशी येथे डोक्यात बीअरची बाटली मारून आणि गोळी झाडून त्याचा खून करण्यात आला होता.