किनवटमध्ये दिवसाढवळ्या मुख्याध्यापिकेचा धारदार शस्त्राने वार करुन खून

746

नांदेड, दि. २४ (पीसीबी) – भरदिवसा एका मुख्याध्यापिकेचा धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात गुरुवारी (दि.२३) घडली.

सुरेखा राठोड (वय ३२) असे खून झालेल्या मुख्याध्यापिकेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील शिवनगर भागात राठोड हे दाम्पत्य राहते. मृत सुरेखा राठोड यांचे पती विजय हे देखील शिक्षक आहेत.  ते सकाळी  वानोला येथे नोकरीसाठी गेले. शांतीनिकेतन शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या सुरेखा राठोड या शाळेत गेल्या नव्हत्या.  यामुळे शाळेतील सेविका दुपारी  बारा वाजण्याच्या सुमारास घरी आल्यानंतर खून झाल्याचे उजेडात आले. त्यानंतर तिने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा केला. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.  किनवट पोलिस तपास करत आहेत.