काही जण बोलघेवडे असतात, त्यांना नुसत्या सभा जिंकायच्या असतात ;  अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

1168

पुणे, दि. १२ (पीसीबी) – गेल्या ६० वर्षातील सिंचनाचा पैसा कुठे गेला? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात आज (रविवार) केला.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थित होते. राज ठाकरेंच्या या प्रश्नाला अजित पवारांनी आपल्या शैलीत उत्तर देताना काही जण बोलघेवडे असतात.  ते काहीच करत नाही. त्यांना केवळ सभा जिंकायच्या असतात, असा टोला  लगावला.

पुणे येथे पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अजित पवार बोलत होते.  यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, अभिनेता आमिर खान, किरण राव, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ आदी उपस्थित होते.

यावेळी अजित पवार यांनी आमिर खान यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. त्याचवेळी आमिरला राजकारणात न येण्याचा सल्लाही दिला. आमिर खान पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून चांगले करीत आहे. त्यामुळे तुम्हाला नागरिक डोक्यावर घेत आहे. पण आमिर यांनी भविष्यात कधी ही राजकीय व्यासपीठावर जाऊ नये. तसेच तुमच्यावर कोणाचाही  शिक्का मारून घेऊ नका, असा सल्ला अजित पवार यांनी अमीर खान यांना दिला.  आमच्यावर कोणत्या न कोणत्या राजकीय पक्षांचा एक शिक्का असल्याचे अजित पवार म्हणाले.