कासारवाडीत महामेट्रोने उभारलेल्या बॅरिगेट्सला धडकून रिक्षाला अपघात; दोन विद्यार्थी जखमी

269

कासारवाडी, दि. २८ (पीसीबी) – महामेट्रोने उभारलेल्या बॅरिगेट्सला धडक दिल्याने भरधाव रिक्षेचा अपघात झाला. या अपघातात दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही घटना आज (मंगळवार) दुपारच्या सुमारास कासारवाडी येथील पुणे-मुंबई हायवेवर घडली. काही सतर्क नागरिकांनी रिक्षेतून वेळीच विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, कासारवाडी परिसरात मेट्रोचे काम सुरु असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. मेट्रोच्या कामासाठी ठिकठिकाणी बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत. आज (मंगळवार) दुपारी बाराच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षेचा अपघात झाला. अरुंद रस्त्यावर चालक रिक्षा वेगाने चालवत होता. यादरम्यान चालकाचे रिक्षेवरील नियंत्रण सुटले. रिक्षा थेट महामेट्रोने उभारलेल्या बॅरिगेट्सला जाऊन धडकली आणि पलटी झाली. रिक्षात पाच विद्यार्थी प्रवास करत होते. काही सतर्क नागरिकांनी तातडीने रिक्षा खाली असलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. यातील दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व विद्यार्थी हे खडकीतील सेंट जोसेफ शाळेतील विद्यार्थी आहेत.