कासारवाडीत नऊ जणांच्या टोळीकडून एकावर प्राणघातक हल्ला

95

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन नऊ जणांच्या टोळीने एकाला लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच त्याच्या तोंडावर फरशी मारुन गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि.१३) रात्री पावणेदहाच्या सुमारास कासारवाडी शास्त्रीनगर येथील काव्या हॉटेलजवळ घडली.

विरु शरणाप्पा शिरसाठ (वय २७, रा. साईनगर चाळ, महिला आयटीआयच्या पाठीमागे, कासारवाडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, सर्फराज उर्फ रावण शेख (वय २१), सोहेल शेख (वय २०), शाहबाज शेख, सोहेल पटेल, इस्माईल पटेल, अरबाज शेख, इरु उर्फ इऱ्या (सर्व रा. कासारवाडी), अमीर शेख (रा. फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी) आणि शहबाज शहा (रा. पिंपळे गुरव) या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास कासारवाडी शास्त्रीनगर येथील काव्या हॉटेलजवळ जखमी विरु शिरसाठ उभा होता. यावेळी आरोपी इस्माईल याने विरुसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून त्याचे आठ साथीदार बोलवून घेतले. आणि विरु याला लाथा-बुक्क्यांनी जबर मारहण केली. तर आरोपी अरबाज शेख याने विरु याच्या तोंडावर फरशी मारुन त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात वरील नऊही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील शाहबाज शेख, सोहेल पटेल आणि इस्माईल पटेल या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर आरोपी अद्याप फरार आहेत. भोसरी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.