काश्मीरमध्ये मेजरसह तीन जवान शहीद; दोन दहशतवाद्यांचा खात्मा  

104

श्रीनगर, दि. ७ (पीसीबी) – जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईमध्ये चार जवान शहीद झाले आहेत. गुरेज भागात दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. या परिसरात दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात चार जवान शहीद झाले असून यामध्ये एक मेजर आणि तीन जवानांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. श्रीनगरपासून १२५ किमी अंतरावर असणाऱ्या गुरेज येथे आठ दहशतवादी नियंत्रण रेषा पार करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, लष्कराने त्यांचा घुसघोरी करण्याचा प्रयत्न उधळून लावला.

सोमवारी मध्यरात्री उत्तर काश्मीरमधील बांदीपोराच्या गुरेज सेक्टरमध्ये आठ दहशतवादी घुसखोरी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले होते. यावेळी सुरक्षा दलाने या आठही दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला आणि जवानांवर मोर्टारही डागले. यात सुरक्षा दलाचे चार जवान शहीद झाले. यावेळी २ दहशतवाद्यां खात्मा करण्यात जवानांना यश आले. ही चकमक अद्याप सुरूच आहे.