काश्मीरमधल्या फुटीरतावादी बांडगुळांची छाटणी करा-शिवसेना

145

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – काश्मीरमधले फुटीरतावादी नेते सय्यद अली शहा गिलानी आपण पाकिस्तानी आहोत आणि पाकिस्तान आपला आहे असं वक्तव्य केले आहे. या संदर्भातला एक व्हिडिओच व्हायरल झाला आहे. हम पाकिस्तानी हैं और पाकिस्तान हमारा है. अशा घोषणा या व्हिडिओत दाखवण्यात आलेल्या भाषणात गिलानी करत आहेत. हाच मुद्दा उचलून आता शिवसेनेने गिलानी आणि त्यांच्यासारख्या तमाम फुटीरतावाद्यांवर निशाणा साधला आहे. एकीकडे जिहाद्यांचा दहशतवाद तर दुसरीकडे गिलानीसारख्यांचा फुटिरतावाद पोसला जातो आहे. ही सगळी फुटीरतावादी बांडगुळे आहेत त्यांची फक्त आर्थिक नाकेबंदी करून उपयोग नाही त्यांची पूर्ण छाटणीच करायला हवी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेने ही भूमिका मांडली आहे.

‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अल जवाहिरी याने काश्मीरवरून हिंदुस्थानला धमकी दिली आहे; तर दुसरीकडे काश्मिरी फुटीरतावादी नेते सय्यद अली शहा गिलानी यांनी त्यांच्या पाकिस्तानप्रेमाची बांग दिली आहे. अल जवाहिरी याने काश्मीरमध्ये दहशतवाद भडकविणारा संदेश सोशल मीडियावर जारी केला आहे, तर सय्यद गिलानी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हे महाशय ‘आपण पाकिस्तानी आहोत आणि पाकिस्तान आपला आहे,’ असे गरळ ओकताना दिसतात. इस्लामी दहशतवादी संघटना आणि त्यांचे म्होरके काय किंवा त्यांच्यासाठी जम्मू-कश्मीरमध्ये वळवळ करणारे फुटीरतावादी काय, सगळे एकाच माळेचे मणी आहेत. अल कायदा आणि इतर दहशतवादी संघटना या देशाच्या उघड उघड शत्रू आहेत. मात्र गिलानी, आसिया अंद्राबी, बिलाल लोन, मीरवाइज उमर फारुख आणि इतर फुटीरतावादी नेत्यांनाही वेळोवेळी पाकप्रेमाचा पान्हा फुटत असतो. गिलानी यांचा हा व्हिडीओ काश्मीरमधील कोणत्या भागाचा आणि कधीचा आहे याचा नेमका तपशील समोर आलेला नाही. मात्र त्यापेक्षा गिलानी यांनी सोडलेले हिरवे फुत्कार गंभीर आहेत.

काश्मीरचा लचका तोडून पाकड्यांच्या घशात घालण्यासाठी कारस्थाने करायची. स्वतःच्या मुलामुलींना शिक्षण आणि नोकरीसाठी परदेशात ठेवायचे आणि काश्मिरी तरुण-तरुणींची माथी मात्र हिंदुस्थानद्वेषाने भडकवायची. आमच्या सैनिकांवर फेकण्यासाठी त्यांच्या हातात दगड द्यायचे. स्वतःच्या मुलांना घडवायचे आणि काश्मिरी तरुणांना बिघडवायचे! कश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांचे वर्षानुवर्षे हेच धंदे सुरू आहेत. इस्लामी दहशतवादी आणि काश्मीरमधील फुटीरतावादी या दोघांचे ‘लक्ष्य’ काश्मीरचा तुकडा पाकड्यांच्या घशात घालण्याचे आहे. त्यासाठी एकीकडे जिहाद्यांचा दहशतवाद तर दुसरीकडे गिलानीसारख्यांचा फुटीरतावाद पोसला जात आहे. या सगळय़ांना पाकिस्तानकडून कसा रग्गड पैसा दिला जातो हे सध्या तुरुंगात असलेल्या आसिया अंद्राबी या महिला नेत्यानेच कबूल केले आहे. सय्यद गिलानीसारख्या नेत्यांनादेखील म्हणूनच पाकप्रेमाचा पान्हा फुटत असावा. काश्मीरसारख्या नंदनवनात पोसली जात असलेली ही फुटीरतावादी बांडगुळे आहेत. त्यांची फक्त आर्थिक नाकेबंदी करून किंवा त्यांच्या नाड्या आवळून उपयोग नाही, त्यांची पूर्ण छाटणीच करायला हवी.