काश्मीरप्रश्नी भारताशी चर्चा करा; इम्रान खान यांना ट्रम्पचा सल्ला

162

वॉश्गिंटन, दि. १७ (पीसीबी) – काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पाकिस्तानने भारताशी चर्चा करावी असा सल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना दिला आहे. काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय करण्याचा पाकिस्तानचा अजून एक प्रयत्न अपयशी ठरला आहे.

भारताने कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने सर्व पातळ्यांवर भारताचा निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेत रविवारी या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. भारताचे पाकिस्तानातील मुख्य परराष्ट्र सचिवांनाही भारतात परत पाठवण्यात आले. शुक्रवारी इम्रान खान यांनी ट्रम्प यांच्याशी चर्चा केली आहे. काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करा अशी विनंतीही केली. ट्रम्प यांनी मात्र ही विनंती धुडकावून लावली. काश्मीर हा आंतरराष्ट्रीय मुद्दा नसून भारत-पाकमधील वाद आहे. भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय चर्चेतून हा प्रश्न सोडवावा असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे.

काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. पण नंतर आपल्या विधानावरून त्यांनी युटर्न घेतला होता. कलम ३७० रद्द झाल्यानंतर पाकिस्तानने भारताशी असलेले संबंध तोडण्यास सुरुवात केली आहे. तसंच ट्रम्प यांना मध्यस्थी करण्यासाठी वारंवार विनंती केली आहे.