काश्मिरी मुले आणि महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाटते- मलाला

199

लंडन, दि. ८ (पीसीबी) – नोबेल पुरस्कार विजेता मलाला यूसुफझाई हिने काश्मीरमधील परिस्थितीवर भाष्य करत चिंता व्यक्त केली आहे. गेल्या ७ दशकांपासून चालत आलेली काश्मीर समस्या संबंधित पक्षांनी शांततेच्या मार्गाने सोडवली पाहिजे असे भारत आणि पाकिस्तानचे नाव न घेता मलालाने म्हटले आहे. आपल्याला काश्मिरी मुले आणि महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता सतावत असल्याचेही मलालाने लिहिले आहे.

मलाला आपल्या ट्विटमध्ये म्हणते, ‘मी जेव्हा लहान होते, जेव्हा माझे आई-बाबा लहान होते, जेव्हा माझे आजी-आजोबा तरुण होते तेव्हा पासूनच काश्मिरी लोक युद्धाचे सावट असलेल्या क्षेत्रात राहत आहेत. गेल्या ७ दशकांपासून काश्मिरी मुलांना गंभीर हिंसेच्या वातावरणात राहावे लागत आहे.’

दक्षिण आशिया हे आपले घरच असल्यामुळे आपल्याला काश्मीरची अधिक काळजी आहे, असेही मलालाने लिहिले आहे. दक्षिण आशियात १.८ बिलियन लोक राहतात. यात काश्मिरींचाही समावेश आहे. आम्ही विविध संस्कृती, धर्म, भाषा, खानपान आणि परंपरांना मानतो.