काश्मिरी पंडितांवरील हल्ले रोखायचे असतील तर सरकारने…

67

जम्मू-काश्मीर, दि. १६ (पीसीबी) : काश्मिरी पंडितांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा वातावरण तापू लागलं आहे. राहुल भट या तरुणाच्या हत्येनंतर सुरू झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर आता जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘काश्मिरी पंडितांवरील हल्ले रोखायचे असतील तर सरकारने काश्मीर फाईल्स या सिनेमावर बंदी घालावी,’ अशी मागणी अब्दुल्ला यांनी केली आहे.

‘काश्मीर फाईल्स हा सिनेमा सत्यावर आधारित आहे का, असा प्रश्न मी सरकारला विचारला होता. खरंच एखादा मुस्लीम आधी एखाद्या हिंदूला मारेल आणि नंतर त्याचं रक्त भातात टाकून तो भात पत्नीला खायला देईल का? आम्ही इतक्या खालच्या पातळीवर घसरलो आहोत का?’ असा सवालही फारूख अब्दुल्ला यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, काश्मीर फाईल्स या निराधार सिनेमाने देशात केवळ द्वेष पसरवण्याचं काम केलं आहे, असंही अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या काश्मीर फाईल्स या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमावरून मोठं वादंग निर्माण झालं होतं. केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपने या सिनेमाचं जोरदार समर्थन केलं होतं. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेकांनी हा सिनेमा एका विशिष्ट धर्माला टार्गेट करण्यासाठी तयार करण्यात आल्याचं सांगत टीका केली होती. त्यातच आता फारूख अब्दुल्ला यांनी बंदी घालण्याची मागणी केल्याने हा सिनेमा पुन्हा चर्चेत आला आहे.