काळेवाडीत सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून टेम्पो चालकाचा खून

89

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून एका टेम्पो ट्रॅव्हलर चालकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (सोमवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास काळेवाडी येथून उघडकीस आली.

अनिल रमेश सुतार (रा. चिंबळी, ता. खेड, जि. पुणे) असे खून झालेल्या टेम्पो ट्रॅव्हलर चालकाचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पो ट्रॅव्हलरचे मालक संतोष जाधव (रा. भोसरी) यांनी वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अनिल सुतार हे संतोष जाधव यांच्या सतरा सीटर टेम्पो ट्रॅव्हलर (एम.एच/१४/जी.डी/७६०८)  वर चालक म्हणून कामाला होते. ते टेम्पोमध्येच राहत होते. आज सोमवार सकाळी टेम्पो भाड्याने पाठवायचा असल्याने जाधव हे चालक सुतार यांना फोन करीत होते. मात्र बराच वेळ त्यांचा काही प्रतिसाद न आल्याने ते सुतार यांना पाहण्यासाठी काळेवाडी येथे गेले. त्यावेळी सुतार यांच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून सुतार यांचा खून झाल्याचे जाधव यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती तातडीने वाकड पोलिसांना दिली. वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत अधिक तपास करत आहेत.