काळेवाडीत एटीएमवरील दरोडा वाकड पोलिसांनी उधळला; पाच सराईतांना दोन पिस्टल आणि जिवंत काडतुसांसह अटक

274

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – काळेवाडी चौक, पेट्रोलपंपाजवळील एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत आसलेल्या पाच सराईत चोरट्यांना वाकड पोलिसांच्या पथकाने २ पिस्टल, ३ जिवंत काडतुसे, कोयता, मिरची पुड, नायॉन रस्शी, स्टील रॉ़ड, पाच मोबाईल आणि एक स्विफ्ट कारसह अटक केली.

दुर्गेश बापु शिंदे (वय ३२, रा. दादा पाटील यांच्या ऑफिसमध्ये वाकड चौक, मुळ रा. श्रीरामपुर जि. अहमदनगर), प्रमोद संजय सवने (वय २९, रा. अष्टविनायक कॉलनी वाकड), भैय्या उर्फ सचिन बबन जानकर (वय २६, रा. अण्णाभाऊ साठेनगर, वाकड), नाना उर्फ सचिन रामचंद्र शिंदे (वय ३२, रा. क्षीतीज कॉलनी, वाकड) आणि रामकृष्ण सोमनाथ सानप (वय ३०, रा. सदगुरु कॉलनी वाकड मुळ रा. रामेश्र्वर वस्ती, ता. भुम जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या पाच सराईतांची नावे आहेत. या सर्वांविरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी प्रमोद कदम यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती कि, स्विफ्ट कारमधून येवून काळेवाडी चौकातील पेट्रोल पंपावरील एटीएमवर काही तरुण दरोडा टाकणार आहेत. तसेच त्यांच्याजवळ पिस्टल आणि कोयता आहे. यावर वाकड पोलिसांनी काळेवाडी चौकातील पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या एटीएमजवळ सापळा रचला. तसेच त्या ठिकाणी दबा धरुन स्वीफ्ट कारमध्ये बसलेल्या पाचही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २ पिस्टल, ३ जिवंत काडतुसे, कोयता, मिरची पुड, नायॉन रस्शी, स्टील रॉ़ड, पाच मोबाईल आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करुन पाचही आरोपींना अटक केली. तसेच त्यांची स्वीफ्ट कार (क्र.एमएच/१४/सीके/११६१) ही देखील जप्त केली. पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता ते दरोडा टाकण्याच्या तयारी होते असे कबुल केले आहे. तर आरोपी दुर्गेश शिंदे यांच्या विरोधात श्रीरामपुर आणि वाकड पोलीस ठाण्यात एकूण ९, सचिन जानकर याच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात ५, सचिन शिंदे विरोधात कोथरुड आणि वाकड असे एकूण २, रामकृष्ण सानप विरोधात भुम आणि वाकड पोलिस ठाण्यात २ तर प्रमोद सवने विरोधात वाकड पोलिस ठाण्यात १ गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त विनायक ढाकणे, परीमंडळ २ पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने, पोलीस उपनिरीक्षक हरिश माने, पोलीस उपनिरीक्षक सिध्दनाथ बाबर तसेच पोलिस कर्मचारी विक्रम जगदाळे, नितीन ढोरजे, प्रमोद कदम, भैरोबा यादव, विजय गंभीरे, दिपक भोसले, शाम बाबा, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, सुरेश भोसले, सुरज सुतार, प्रशांत गिलबिले, जावेद पठाण, रमेश गायकवाड यांच्या पथकाने केली.