कार सोडून मोबाईल घेऊन चालक पसार

134

सांगवी, दि. 26 (पीसीबी) : कारवर चालक म्हणून काम करत असलेल्या चालकाने कार पुण्यात सोडून मालकाने वापरण्यासाठी दिलेला मोबाईल घेऊन पळ काढला. ही घटना 28 ऑगस्ट रोजी दुपारी घडली.

राहुल विजय वानखडे (रा. इंगवले चौक, पिंपळे निलख) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राजीव कुमार सक्सेना (वय 69, रा. पिंपळे निलख) यांनी 25 ऑक्टोबर रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कारवर आरोपी राहुल चालक म्हणून काम करत होता. दरम्यान त्याचा मोबाईल फोन खराब झाल्याने फिर्यादी यांनी त्यांचा मोबाईल फोन आरोपीला वापरण्यासाठी दिला. 28 ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता आरोपीने फिर्यादी यांना फोन करून सांगितले की, पुणे कॅम्प मधील एका मॉल समोर तुमची कार सोडली आहे. त्यानंतर राहुल फिर्यादी यांनी दिलेला दोन हजारांचा मोबाईल फोन आणि ट्रिपचे 1200 रुपये न देता निघून गेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.