कार कंपनीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने जेष्ठ नागरिकाला लाखाचा गंडा

95

निगडी, दि. १८ (पीसीबी) – “तुम्हाला हुंदाई कार कंपनीमध्ये नोकरी मिळाली आहे. तुम्ही घरून काम करू शकता”, असे सांगून ज्येष्ठ नागरिकाला एका ठगाने १ लाख १० हजारांचा गंडा घातला. ही घटना ११ ते १५ एप्रिल २०१९ या कालावधीत निगडी येथे घडली.

याप्रकरणी जोसेफ रजिनाल्ड मेंडोंसा (वय ६१, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोसेफ यांना नोकरीची गरज असल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी गुगल वेबसाईटवर नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज केला होता. त्यानंतर अज्ञातांनी त्यांना फोन करुन तुम्हाला हुंदाई या कार कंपनीत नोकरी लागली असल्याचे सांगून वेळोवेळी जोसेफ यांच्याकडून १ लाख १० हजार ६०० रुपये बँक खात्यावर भरून घेतले. पैसे घेऊन जोसेफ यांना नोकरी दिली नाही. तसेच घेतलेले पैसेही परत केले नाही. निगडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.