कारमधील एअर बॅगमुळे सोलापूरला प्रचाराला निघालेल्या काँग्रेस महिला आमदाराचे प्राण वाचले

154

सोलापूर, दि. १३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीनिमित्त काँग्रेसच्या प्रचारासाठी सोलापूरमध्ये येणारी कर्नाटकमधील महिला आमदार कार अपघातात थोडक्यात बचावली. समोरून येणाऱ्या मोटारीची धडक बसल्याने घडलेल्या अपघातात बेळगाव भागातील काँग्रेसच्या आमदार अंजली निंबाळकर या बचावल्या असून त्यांना जखमी अवस्थेत सोलापूरच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विजापूर- सोलापूर महामार्गावर हत्तूर येथे शुक्रवारी अपघात झाला. आमदार निंबाळकर या कर्नाटकातील पोलीस महानिरीक्षक हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी असून त्या डॉक्टर आहेत. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथून त्या कर्नाटक विधानसभेत निवडून येतात. लोकसभा निवडणुकीत सोलापूरमधील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी आमदार अंजली निंबाळकर आपल्या मोटारीने सोलापूरकडे येत होत्या. परंतु हत्तूरजवळ त्यांच्या कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने धडक दिली. हा अपघात घडताच आमदार निंबाळकर यांच्या कारमधील एअर बॅग लगेचच उघडली गेली. त्यामुळे त्या बचावल्या. या अपघातात आमदार निंबाळकर आणि त्याचा वाहनचालक हे दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.