कारची तोडफोड करत चालकाला कोयता दाखवून लुटले

226

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – मुलांसोबत कार मधून फिरायला जात असलेल्या एका व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून लुटले. तसेच कारची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी (दि. 20) रात्री सव्वा आठ वाजता पिंपरी कॅम्प दुर्गादेवी मंदिरासमोर घडली.

ओमप्रकाश नारायणदास नाथपोतानी (वय 41, रा. मेन बाजार, पिंपरी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या कारमधून (एम एच 14 / जे आर 0942) त्यांची दोन मुले आणि बहिणीचा मुलगा यांच्यासोबत फिरायला जात होते. पिंपरी कॅम्प मधील दुर्गादेवी मंदिरासमोर आल्यानंतर एका पंचवीस ते तीस वर्ष वयोगटातील अनोळखी इसमाने फिर्यादी यांची कार अडवली. कारच्या बोनेटवर कोयत्याने मारले. तसेच कारवर अन्य ठिकाणी कोयत्याने मारून कारचे 15 हजार रुपयांचे नुकसान केले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून कोयत्याचा धाक दाखवला. फिर्यादी यांच्या शर्टच्या खिशात ठेवलेले 4 हजार 500 रुपये आरोपीने जबरदस्तीने काढून घेतले. ‘मी इथला दादा आहे. जर मध्ये कोणी आले तर मी एका एकाला खल्लास करून टाकीन’. असे जोरात ओरडून कोयता दाखवून परिसरात दहशत निर्माण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.