कापड दुकानदाराकडे खंडणी मागत कोयत्याने दुकानाची व वाहनांची तोडफोड….

60

रुपीनगर, दि. १२ (पीसीबी) – दोन जणांनी एका कापड दुकानात काम करणाऱ्या कामगाराकडे हप्ता चालू करण्याची मागणी करत दुकान फोडण्याची धमकी दिली. कामगाराने मालकाला विचारून सांगतो असे म्हटले असता दोघांनी कोयत्याने दुकानाची आणि दुकानासमोरील दोन वाहनांची तोडफोड केली. ही घटना सोमवारी (दि. 10) रात्री पावणे नऊ वाजता रुपीनगर येथील रुबाब मेन्स वेअर या दुकानात घडली.
रोहन चरणदास लोट (वय 24, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रुपीनगर येथील रुबाब मेन्स वेअर या कपड्यांच्या दुकानात काम करतात. सोमवारी रात्री अनोळखी दोघेजण दुकानात आले. त्यांच्याकडील कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी यांच्याकडून हप्ता चालू करण्याची मागणी करत दुकानाची तोडफोड करण्याची धमकी दिली. फिर्यादी यांनी मालकाला विचारून सांगतो असे सांगितले असता आरोपींनी दुकानाच्या काउंटर आणि प्रवेशद्वाराच्या काचा फोडून नुकसान केले. त्यांनतर दुकानासमोर पार्क केलेल्या रिक्षा आणि कार अशा दोन वाहनांची देन वाहनांची देखील तोडफोड करून नुकसान केले. पोलीस उपनिरीक्षक विवेक कुमटकर तपास करीत आहेत.