कात्रजमध्ये भिशीचे पैसे न दिल्याने चुलत भावाचा सत्तुरने वार करुन खून

287

पुणे, दि. ३१ (पीसीबी) – भिशीचे पैसे परत न केल्याच्या रागातून दोन भावांनी त्यांच्या चुलत भावाचा सत्तुरने वार करुन खून केला आहे. ही घटना सोमवारी (दि.३०) रात्री साडेनऊच्या सुमारास कात्रज येथील साईनगरमध्ये घडली.

चंदर मुडावत ( वय ३०, रा. स. नं ६३, साईनगर गल्ली नं ३, कात्रज) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मी चंदर मुडावत (वय २८ ) यांनी  भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामु मुडावत आणि लालु मुडावत ( दोघे.रा. गोकुळनगर, कात्रज कोंढवा रस्ता) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत चंदर आरोपी रामु आणि लालु हे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. चंदर याच्या मित्रांनी रामु आणि लालु यांचे भिशीचे पैसे परत केले नव्हते. यामुळे चंदर आणि रामु यांच्यामध्ये याआधी देखील वाद झाला होता. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास चंदर हा पत्नी लक्ष्मी आणि बहिण शारदा यांच्यासह कात्रज येथील त्याच्या राहत्या घरात जेवण करत होता. यावेळी आरोपी रामु आणि लालु यांनी त्याच्या घरात घुसून चंदरला लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच सत्तुरने मानेवर वार केले. यामध्ये चंदरचा जागीच मृत्यू झाला. भारती विद्यापीठ पोलिसांनी रामु आणि लालु या दोघा आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.