‘काका-पुतण्याच्या टोळीने मुळशी पॅटर्नद्वारे कब्जा केलेली 113 एकर जमीन पुन्हा परत मिळवली’; पडळकरांचं खोचक ट्विट

247

सोलापूर, दि.१५ (पीसीबी) : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे कि, ‘काका-पुतण्याच्या टोळीने मुळशी पॅटर्नद्वारे कब्जा केलेली 113 एकर जमीन पुन्हा परत मिळवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला. त्याबद्दल कोर्टाचे आभारी आहोत.’ आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत. कारण श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तांना पंरपरागत मिळालेल्या देवस्थानच्या जमिनी ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ कब्जा केलेली 113 एकर जमीन मोकळी केली. आता लवकरच यांचे पितळ जगापुढे उघडे पडणार आहे, असं पडळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे कुणाचे पितळ उघडे पडणार यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

पडळकर यांनी ट्विटमध्ये कुठेही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. मात्र, त्यांनी पवार कुटुंबीयांच्या दिशेने सूचक इशारा केला आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहे.

पडळकर यांच्या आरोपांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीवर बोलण्यासाठी भाजपने काही लोकांची खास नियुक्ती केल्याचं दिसून येतं. त्यामुळे हे लोक आमच्याबद्दल बोलत असतात. शिवाय मोठ्या कुटुंबावर वारंवार बोलल्यानंतर त्यांच्या दिशेने कॅमेरे जातात. आपोआपच त्यांना प्रसिद्धी मिळते त्यामुळेच ते असं विधान करत असतात, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

दरम्यान पडळकरांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं पाठवलं होतं. सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यामुळे राज्यपाल पडळकरांच्या पत्रावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. गोपीचंद पडळकर यांनी या पत्रात परकीय आक्रमणापासूनचा उल्लेख करत अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा का बसवला पाहिजे याची माहिती दिली होती.

परकीय आक्रमणाने छिन्नविछीन्न झालेल्या हिंदू संस्कृतीचा व मंदिरांचा जीर्णोद्धार माँसाहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला. त्यामुळेच माँसाहेबांच्या कर्तृत्वाला ‘पुण्यश्लोक’ संबोधलं गेलं. माँसाहेबांची शिवपिंडधारी केलेली प्रतिमा आजही जनमानसात रूजलेली आहे. पण त्याच बरोबर माँसाहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक कुशल प्रशासक, एक मुत्सद्दी राजकारणी आणि महापराक्रमी महाराणी होत्या. त्यांच्या व्यक्तीमत्वातील पराक्रमी बाण्याचा पैलूही जनमाणसात रूजला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या महान कर्तृत्वाला साजेसा पुतळाही त्याच ताकदीचा असला पाहिजे. त्यासाठी सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ आवारात उभारला जाणारा प्रस्तावित पुतळाही ‘अश्वारूढ’च असला पाहिजे. अशी सर्वसामान्य जनतेची आग्रही भावना आहे, असं पडळकर यांनी म्हटलं होतं.

WhatsAppShare