काकासाहेब शिंदेंच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत, तर भावाला सरकारी नोकरी

78

औरंगाबाद, दि. २४ (पीसीबी) – मराठवाड्यात सकल मराठा मोर्चाच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनात सोमवारी (दि.२३) काकासाहेब शिंदे (वय २८) या तरुणाने गंगापूर तालुक्यातील कायगाव टोक येथे पुलावरील गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारली. यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांनी सुरुवातीला मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. अखेर जिल्हा प्रशासनाने शिंदे कुटुंबियांना १० लाख रुपये आणि त्यांच्या भावालाही सरकारी नोकरी देण्याचे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर शिंदे यांच्या कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारला.

आज (मंगळवारी) सकाळी दहाच्या सुमारास त्यांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे यांना स्थानिकांनी विरोध करून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. अखेर खैरे यांना बंदोबस्तात तिथून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, गंगापूर तालुक्यात तणावाचे वातावरण आहे. काकासाहेब शिंदेच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथे सोमवारी दुपारी तीनच्या दरम्यान गोदावरी नदीवरील पुलाकडे मोर्चेकरी निघाले. त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातच काकासाहेब शिंदे यांनी पुलावरून उडी मारली. त्यांचा तेथे मृत्यू झाला.