काकासाहेब शिंदेंच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंना रोखले

41

औरंगाबाद, दि. २४ (पीसीबी) – गंगापूर तालुक्यातील काकासाहेब शिंदे यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना संतप्त जमावाने रोखले. यावेळी खैरेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर जमावाच्या तीव्र भावना लक्षात घेता अखेर खैरे यांनी माघारी परण्याचा निर्णय घेतला.    

गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथे सोमवारी दुपारी तीनच्या दरम्यान गोदावरी नदीवरील पुलाकडे मोर्चेकरी निघाले. त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातच काकासाहेब शिंदे यांनी पुलावरून उडी मारली. त्यांचा तेथे मृत्यू झाला.

यानंतर काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांनी सुरुवातीला मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. अखेर जिल्हा प्रशासनाने शिंदे कुटुंबियांना १० लाख रुपये आणि त्यांच्या भावालाही नोकरी देण्याचे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर शिंदे यांच्या कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारला. आज (मंगळवारी) सकाळी दहाच्या सुमारास त्यांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे यांना स्थानिकांनी विरोध करून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. अखेर खैरे यांना बंदोबस्तात तिथून बाहेर काढण्यात आले.