कांचनजुंगा मोहीम फत्ते, ‘गिरीप्रेमी’ने रचला इतिहास

148

पुणे, दि. १५ (पीसीबी) – पुण्यातील ‘गिरीप्रेमी’ या गिर्यारोहण संस्थेच्या १० गिर्यारोहकांनी आज सकाळी जगातील तिसऱ्या आणि भारतातील पहिल्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कांचनजुनगावर तिरंगा फडकविला. उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेली ही सातवी अष्टहजारी मोहीम आहे. कांचनजुंगा इको इक्स्पेडीशन २०१९ ही भारतातील सर्वात मोठी व सर्वात पहिली यशस्वी नागरी मोहीम आहे. एकाच दिवशी १० च्या आसपास गिर्यारोहकांनी कांचनजुंगावर एकाच दिवशी चढाई करणे हा नवा विक्रम असून जेष्ठ गिर्यारोहक माया शेर्पा आणि सिंगापूरचे खु स्वी चाऊ यांनी देखील या मोहिमेदरम्यान शिखर चढाई केली.

या आधी २०१२ मध्ये माउंट एव्हरेस्ट, २०१३ मध्ये माउंट ल्होत्से, २०१४ मध्ये माउंट मकालू, २१०६ मध्ये माउंट धौलागिरी आणि माउंट च्यो ओयू व २०१७ मध्ये माउंट मनास्लूवर मोहीम यशस्वी फत्ते केली होती. अशी कामगिरी करणारे उमेश झिरपे भारतातील एकमेव गिर्यारोहक मोहीम नेते आहेत. गिरिप्रेमीच्या आशिष माने, रुपेश खोपडे, भूषण हर्षे, आनंद माळी, प्रसाद जोशी, कृष्णा ढोकले, डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर व जितेंद्र गवारे यांनी आंतरराष्ट्रीय मोहिमेच्या बेस कॅम्पवरून शिखराची चढाई केली.