काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची आघाडीबाबत बैठक; जागा वाटपावर चर्चा

365

मुंबई, दि. १२ (पीसीबी) –  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. विधान सभेतील  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी  मंगळवारी (दि.११) रात्री काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची आघाडीबाबत बैठक झाली. यावेळी जागा वाटपावरुन दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

या बैठकीला काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,  संजय निरुपम,  तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ,  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.

या बैठकीत सत्ताधारी भाजप-शिवसेनेविरोधात समविचारी पक्षांना एकत्र घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीसह महाआघाडी बनवण्याच्या निर्णयावर दोन्ही पक्षांच्या नेत्यामध्ये एकमत झाले. तसेच जागा वाटपाबाबत पहिल्यांदाच चर्चा करण्यात आली.

यावेळी भविष्यात दोन्ही पक्ष कोणत्या जागा लढवणार,  महाआघाडीतील घटक पक्षांना कोणत्या जागा द्यायच्या हे अंतिम करुन, पुढे वादाच्या जागांवर चर्चा करण्याचे ठरविण्यात आले. पुढील तीन चार दिवसात सपा, बहुजन विकास आघाडी, बसपा यासह काही पक्षांसमवेत चर्चा करुन लोकसभा, विधानसभा जागा दिल्या जातील, असे समजते.