काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार फोडण्यासाठी भाजपची फोनाफोनी!

187

मुंबई, दि. ७ (पीसीबी) –  सत्तेचे समीकरण जुळवून आणण्यासाठी भाजपकडून आमच्या काही आमदारांना फोन येत आहेत. त्यांना प्रलोभन दाखवले जात आहे, असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. असे कितीही प्रयत्न झाले तरी आमचा एकही आमदार फुटणार नाही, असा विश्वासही या नेत्यांनी व्यक्त केला.

भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेला सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन १३ दिवस उलटले तरी महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. उद्यापर्यंत सत्तास्थापनेचा घोळ मिटला नाही तर राज्यात मोठा घटनात्मक पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी रात्री १२ वाजता विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ संपत असून त्यानंतर राज्य राष्ट्रपती राजवटीकडे जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून आता फोडाफोडीचे राजकारणेही सुरू झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या आमदारांना भाजपकडून फोन केले जात असून त्याचा गौप्यस्फोट खुद्द जयंत पाटील आणि वडेट्टीवार यांनी केला.

सत्तेचे गणित जुळवून आणण्यासाठी आमच्या काही आमदारांना आमिष दाखवली जात आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार आता फुटणार नाही. जितकी फुटाफूट व्हायची होती ती निवडणुकीच्या आधीच झाली आहे. जे निवडून आले आहेत ते सर्व नवे चेहरे आहेत. जनतेच्या विश्वासाला पूर्ण पात्र ठरेलेले हे सर्वजण आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला. ‘मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्यांना निकाल लागूनही सरकार बनवणे शक्य होत नाहीय. म्हणूनच आता विरोधी पक्षातून आमदार फुटण्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र आता कोणत्याही पक्षातून आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला तर सर्व पक्ष एकत्र येऊन फुटणाऱ्या आमदारास पराभूत करू, असेही पाटील यांनी ठणकावले. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. आमची विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता आहे, असेही पाटील पुढे म्हणाले.

WhatsAppShare