काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीत राजीव सातव, रजनी पाटील यांचा समावेश; सुशीलकुमार शिंदेंना अर्धचंद्र

21

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीत युवा आणि अनुभवी नेत्यांचा समावेश करत तसेच दिग्गजांना अर्धचंद्र देत राहुल गांधी यांनी पक्षाची नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या या नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील खासदार राजीव सातव, खासदार रजनी पाटील, आमदार बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांना संधी देण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, दिग्विजयसिंह, कमलनाथ, मोहन प्रकाश यांना कार्यकारिणीतून अर्धचंद्र देण्यात आला आहे.

राहुल यांनी पक्षाची धुरा हाती घेतल्यानंतर दोन महिन्यांनी १६ फेब्रुवारी २०१८ रोजी काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करून तिचे संचालन समितीत रूपांतर केले होते. आता राहुल गांधी यांनी २३ सदस्य, १८ स्थायी सदस्य आणि १० आमंत्रित सदस्यांचा समावेश असलेली पक्षाची कार्यकारिणी जाहीर केली आहे. २३ सदस्यीय कार्यकारिणीत राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहनसिंग, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, मुकुल वासनिक, सिद्धरामय्या आदींचा समावेश आहे.

स्थायी आमंत्रितांमध्ये शीला दीक्षित, पी. चिदंबरम, ज्योदिरादित्य शिंदे, बाळासाहेब थोरात, रजनी पाटील, राजीव सातव यांचा समावेश आहे.