काँग्रेस नगरसेवकाने चक्क हुक्का पार्लरमध्ये घेतली निवडणुकीची बैठक

351

नागपूर, दि. १४ (पीसीबी) – युवक काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपन दिलेला उमेदवार निवडून यावा, यासाठी नागपूर येथील युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी शेळके यांनी चक्क हुक्का पार्लरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. शेळके हे मंगळवारी (दि.११) पहाटे दोनच्या सुमारास राजनगर येथील विंड अॅण्ड वुड्स रेस्टॉरेंट मध्ये त्यांच्या काही कार्यकर्त्यांसोबत पोलिसांना आढळून आले. याघटनेमुळे राजकीय वर्तुलात चांगलीच चर्चा रंगली आहे.

पोलिस उपायुक्त नीलेश भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार,  मंगळवारी रात्री स्वत: भरणे हे गस्तीवर होते. यावेळी राजनगर  पोलिस ठाण्याच्या हद्दीत विंड अॅण्ड वुड्स रेस्टॉरेंट पहाटे २ वाजतापर्यंत सुरू असून तेथे हुक्का पार्लरही सुरू असल्याची माहिती भरणे यांना मिळाली. भरणे यांनी त्यांच्या पथकासह विंड अॅण्ड वुड्समध्ये छापा टाकला. पोलिस रेस्टॉरेंटच्या आत जाताच त्यांना नगरसेवक बंटी शेळके व त्यांचे २० कार्यकर्ते दिसले. काही कार्यकर्ते हुक्का पित होते. यामध्ये अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्याचा भाऊही होता. शेळके यांना बघताच भरणे व पोलिस कर्मचाऱ्यांना धक्का बसला. काँग्रेस नेत्यांसह शेळके यांनीही हुक्का पार्लर विरोधात आंदोलन केले होते, याची माहिती पोलिसांनी भरणे यांना दिली. नगरसेवक चक्क हुक्का पार्लरमध्ये आढळल्याने भरणे यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. याशिवाय, याच ठिकाणी दहा अल्पवयीन मुलेही आढळली. पोलिसांनी पार्लरचे संचालक रवींद्रसिंग रनधक यांच्याविरुद्ध चालान कारवाई केली आहे.

दरम्यान,  काँग्रेसचे नेते एकीकडे हुक्का पार्लरविरोधात आंदोलन करतात आणि दुसरीकडे रात्रीच्या अंधारात त्याचा उपभोग घेतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.