काँग्रेस घेणार कार्यकर्त्यांचा ईव्हीएम मशीन क्लास

87

पुणे, दि. १५ (पीसीबी) – यंदाच्या निवडणुकीत ‘मतदानयंत्रां’वर (ईव्हीएम) शहर काँग्रेस बारकाईने लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी सर्व बूथ अध्यक्ष, पोलिंग एजंट आणि मतदान केंद्रप्रमुखांचा ‘ईव्हीएम’ प्रशिक्षण वर्ग घेतला जाणार असून, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी त्यांना काँग्रेस भवनातील मध्यवर्ती कक्षाशी जोडले जाणार आहे. त्यांच्याकडून मतदानयंत्रांबाबत काहीही तक्रार आल्यास तातडीने पोलिस यंत्रणा, निवडणूक अधिकाऱ्यांना कळविण्याचे नियोजन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

पुणे लोकसभेसाठी मतदान करण्यास अवघे नऊ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे काँग्रेसने उमेदवाराच्या प्रचारासोबत बूथ कमिट्यांचे नियोजनही हाती घेतले आहे. पक्षातर्फे शहरातील १,९९७ बूथवर बूथ अध्यक्ष, पोलिंग एजंट आणि मतदान केंद्रनिहाय प्रमुख नेमले जाणार आहेत. मतदान सुरू होण्यापूर्वी ईव्हीएमची तपासणी कशी केली जाते, त्यासाठी कोणती बटणे दाबली जातात, त्याचे ‘सील’ कुठे असते, याबाबत या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे; याशिवाय प्रत्येक मतदानयंत्रावरील अनुक्रमांकही पोलिंग एजंटला दिला जाणार असून, मतमोजणीच्या दिवशी त्याच क्रमांकाचे यंत्र मोजले जात आहे का, याचीही खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या जाणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.