काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; नवनीत राणा प्रचार सोडून रडत माघारी परतल्या  

184

अमरावती,  दि. १५ (पीसीबी) – काँग्रेसच्या अंतर्गत वादात महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. काँग्रेस कार्यकर्त्यांमधील हाणामारी पाहून नवनीत राणा यांना अक्षरशा रडू कोसळले. त्यांनी प्रचार सोडून गाडीत बसून माघारी परतावे लागले. या प्रकारामुळे काँग्रेसमधील बेकी चव्हाटावर आली आहे.    

पठाण चौकात नवनीत राणा काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या सोबत प्रचाराला आल्या होत्या. यावेळी माजी नगरसेवक आसिफ तावक्कल यांनी राणा यांना शेखावत यांना सोबत का आणले, अशी विचारणा केली. यावर शेखावत गाडीतून खाली उतरल्यानंतर आसिफ आणि त्यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. याबाबतची माहिती शेखावत यांचे कार्यकर्ते एजाज मामु यांना समजताच ते कार्यकर्त्यांसह  पठाण चौकात धावून आले. यावेळी आसिफ तावक्कल आणि एजाज मामु यांच्या गटात तुफान हाणामारी झाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी  तातडीने दाखल झाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवून वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोंधळामुळे नवनीत राणा  रडत गाडीत जाऊन  बसल्या होत्या.  त्यानंतर नवनीत राणा आणि रावसाहेब शेखावत माघारी फिरले.