“काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हिंदूंना चिरडू नये अन्यथा तुमचं आम्ही काहीही ठेवणार नाही”: भाजपा आमदार प्रवीण पोटे

121

मुंबई, दि.१७ (पीसीबी) : त्रिपुरा येथे अल्पसंख्याकांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ गेल्या शुक्रवारी राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदला अमरावतीत हिंसक वळण लागल्यानंतर त्याचा निषेध नोंदविण्यासाठी भाजपाने शनिवारी पुकारलेल्या बंद दरम्यान पुन्हा जाळपोळ, हिंसाचार झाला. अमरावतीत सध्या तणावपूर्ण शांतता असून कर्फ्यू लावण्यात आला आहे. शहरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी हिंसाचारप्रकरणी माजी राज्यमंत्री आणि भाजपा आमदार प्रवीण पोटे यांना अटक केली आहे.

अमरावतीमधील हिंसाचारामागे भाजपा असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांकडून केला जात आहे. पोलिसांनीही याप्रकरणी अनेक भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांना अटक केली आहे. भाजपाचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनाही अटक करण्यात आली होती. दरम्यान प्रवीण पोटे यांनीच १३ नोव्हेंबरला अमरावती बंदचं आवाहन केलं होतं. यानंतर आज प्रवीण पोटे यांनी अमरावती सिटी पोलीसांसमोर आत्मसमर्पण करत अटक करुन घेतली. त्यांच्यासह एकूण १० जणांना अटक करण्यात आली आहे.

आत्मसमर्ण करण्यापूर्वी प्रवीण पोटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “अमरावती शहरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद केल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. राज्य सरकारने अमरावती शहरात काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण केली आहे”. पुढे ते म्हणाले की, “हिंदू आपण पेटलेला पाहत आहोत…हिंदूंनी फक्त काडी दाखवली आहे, काडी मारलेली नाही. काडी मारली तर अख्खा हिंदुस्थान पेटल्याशिवाय राहणार नाही. प्रामुख्याने मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सांगतो की हिंदूंना चिरडू नये अन्यथा तुमचं आम्ही काहीही ठेवणार नाही”.

“हिंदूंच्या घऱात गेलो तर त्यांच्या घरी साप मारायला काडीदेखील सापडत नाही. पण त्या दिवशी सगळे हिंदू, व्यापारी स्वत: रस्त्यावर उतरले होते. अमरावती जिल्ह्यात पहिल्यांदाच इतका जबरदस्त बंद पहायला मिळाला. रझा अकादमीवर बंधनं घातलं नाही तर ते असंच सुरु राहणार,” असंही यावेळी त्यांनी म्हटलं,