काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा प्रचार शुभारंभही कोल्हापूरातूनच

75

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेपाठोपाठ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभही कोल्हापुरातून होणार आहे. युतीची सभा २४ मार्च रोजी येथील गांधी मैदानात होत असून त्यानंतर दोन ते तीन दिवसात आघाडीची जंगी सभा घेण्याचे नियोजन सुरू असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. युतीपेक्षा मोठी सभा घेण्याचे नियोजन असल्याचेही दोघांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

आमदार मुश्रीफ म्हणाले, “राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचाराची सुरुवात व्हावी यासाठी खासदार महाडिक प्रयत्नशील आहेत. ते गांधी यांच्याशी संपर्क साधत आहेत. कोल्हापुरातील आघाडीची सभा ही युतीच्या सभेपेक्षा मोठी होईल, या पद्धतीने नियोजन केले जाईल.”

खासदार महाडिक म्हणाले, “समाजातील सर्वच घटक भाजप सरकारच्या विरोधात आहेत. सद्यःस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादीला पोषक वातावरण आहे. कोल्हापुरात संयुक्त सभा घेऊन प्रचाराचा धडाक्यात प्रारंभ होईल. प्रियांका गांधी यांना सभेसाठी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पवार व गांधी यांच्या संयुक्त सभेद्वारे प्रचाराचा धडाका निर्माण होईल.”