काँग्रेसशिवाय विरोधकांची महाआघाडी अशक्य- उद्धव ठाकरे

70

मुंबई, दि. २ (पीसीबी) – भाजपाला नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही. पण पक्षाची विश्वासार्हता संपली असून बिहार व उत्तर प्रदेशात भाजपाचा पराभव होईल असे दिसते. पश्चिम बंगाल, राजस्थान, ओदिशासारखी राज्ये भाजपासोबत जाणार नाही. अन्य राज्यांमध्येही २०१४ चा ‘डिस्को दांडिया’ रंगणार नाही, असा दावा शिवसेनेने केला आहे. काँग्रेसशिवाय विरोधकांची महाआघाडी होणे अशक्य असून राहुल गांधींचे नेतृत्व स्वीकारायचे काय? हा पेच शरद पवारांनाही पडला असावा, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शरद पवार यांच्या विधानाचा आणि भाजपाचा समाचार घेण्यात आला आहे. “योगी नरेंद्र मोदी यांचे ‘राजगुरू’ व देशाच्या राजकारणातील ‘महागुरू’ शरद पवार यांची राष्ट्रीय राजकारणासंदर्भातील विधाने ही स्पष्टवक्तेपणाची लक्षणे आहेत की गुरुजींच्या तोंडून ‘विद्यार्थी’ बोलले, असा गोंधळ निर्माण झाला असून तो गोंधळ ‘पवार पॅटर्न’ला साजेसाच आहे”, असे शिवसेनेने नमूद केले.

शरद पवार यांच्यासारखे नेते विरोधी आघाडीत आहेतही आणि नाहीतही. हा त्यांचा नेहमीचा पायंडा असून नेतृत्व आपल्याकडे नसेल तर तिसरी आघाडी ‘प्रॅक्टिकल’ नाही हे शरद पवारांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी तिसरी आघाडी शक्य नाही. हा प्रयोग व्यवहारी तसेच यशस्वी होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, भाजपाला जे बोलायचे आहे ते विरोधी पक्षांकडून वदवून घेतले जात आहे. विरोधकांना फोडून झोडून सत्ता मिळवायची असे एकंदरीत भाजपचे धोरण दिसते. भाजपाच्या दबावामुळे का होईना एक सूर आहे व त्यामुळे नरडी आवळूनही मुखातून ‘मोदी मोदी’चे नारे घुमत आहेत. शरद पवारांचा ‘सडेतोड’ बाणा त्याच पठडीतला असेल तर विरोधकांनी सावध राहायला हवे, असे शिवसेनेने म्हटले आहे.