काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता; मुंबईतील आमदार भाजपच्या वाटेवर

135

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते  राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी आज (मंगळवार)  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.  मुंबईतील आमदार कालिदास कोळंबकर हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.   

मुंबईतील पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून कोळंबकर सहावेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. आमदार कालिदास कोळंबकर यांच्या कार्यालयांच्या बँनरवर काँग्रेस नेत्यांऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचा फोटो  छापण्यात आला आहे. त्यामुळे कोळंबकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दादर येथील काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयासमोरच कालिदास कोळंबकर यांनी बँनरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत.

कोळंबकर नायगाव  विधानसभा मतदारसंघातून सहावेळा  निवडून आले आहेत. ते मुळचे शिवसेनेचे असून माजी मुख्यमंत्री नारायण राणे  यांच्या मंत्रिमंडळात  ते राज्यमंत्री  होते.  राणे यांच्यासोबत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, राणेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वाभिमानी पक्ष स्थापन केला. परंतु कोळंबकर यांनी काँग्रेसमध्येच थांबणे पसंत केले होते. आता ते  भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.