काँग्रेसमध्ये अंतरिम अध्यक्ष निवडण्यावर विचार

121

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी  आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिल्यास   अन्य पर्यांयांवर पक्षाला विचार करावा लागणार आहे.  तसेच सध्या काँग्रेसमध्ये अंतरिम अध्यक्ष निवडण्यावरही विचार सुरू  आहे. पक्षातील सद्यस्थिती पाहता एका वरिष्ठ नेत्याकडे अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अंतरिम अध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी मदत म्हणून कॉलेजिअम असेल. त्यामध्ये काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांना स्थान देण्यात येऊ शकते.  दरम्यान, आज (मंगळवारी) काँग्रेसचे नेते ए.के.अँटोनी राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच ते पक्षाच्या सद्यस्थितीवर चर्चा करतील माहितीही सूत्रांकडून देण्यात आली.

दरम्यान, लोकसभेसाठी काँग्रेस नेता कोण असेल याची औपचारिक घोषणा पुढील आठवड्यात करण्यात येणार आहे.  १७ जूनपासून संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही लोकसभेत काँग्रेसचे गटनेते म्हणून राहुल गांधी यांच्याच नावाला पसंती दर्शवली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना राहुल गांधी यांनी भेटण्याची वेळ दिली नसल्याचे  सूत्रांकडून सांगितले जात आहे.