काँग्रेसच्या रक्तातच ब्राह्मणांचा डीएनए – रणदीप सुरजेवाला

48

चंदीगड, दि. ५ (पीसीबी) –  काँग्रेस असा पक्ष आहे,  ज्याच्या रक्तातच ब्राह्मणांचा डीएनए आहे, असे म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ब्राह्मण समाजाच्या आरक्षणावरही भाष्य केले. यामुळे आता  काँग्रेसनेही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  ब्राह्मण कार्ड खेळण्याची रणनीती आखल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सुरजेवाला यांनी हरियाणामध्ये ब्राह्मण समाजाच्या एका संमेलनाला संबोधित केले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा फोटो, तिरंगा आणि काँग्रेस पक्षाच्या झेंड्यासोबत ब्राह्मण संमेलनाचे आयोजन का केले जात आहे, अशी विचारणा माझ्या एका सहकाऱ्याने केली. मी सांगितले की याचे उत्तर एक दिवस व्यासपीठावरुन देईल. काँग्रेस असा पक्ष आहे, ज्याच्या रक्तातच ब्राह्मण समाजाचा डीएनए आहे, असे सुरजेवाला म्हणाले.

आगामी निवडणुकीत काँग्रेसला मतदान करावे, असे आवाहन सुरजेवाला यांनी ब्राह्मण समाजाला यावेळी केले. हरियाणामध्ये सत्ता आल्यास ब्राह्मण विकास महामंडळाची स्थापना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच सत्ता आल्यास ब्राह्मण समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करु, असे सुरजेवाला यांनी सांगितले .