काँग्रेसच्या गटनेत्या आरोही तळेगावकर व भाजपाचे नगरसेवक भरत हारपुडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

87

लोणावळा, दि. २ (पीसीबी) : लोणावळा नगरपरिषदेतील काँग्रेसच्या गटनेत्या व माजी उपनगराध्यक्षा आरोही तळेगावकर व भाजपचे माजी गटनेते, नगरसेवक भरत हारपुडे, भाजपचे माजी शहर उपाध्यक्ष गणेश इंगळे यांनी समर्थकांसह गुरुवारी (दि.२) उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये व आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंगेस पक्षात प्रवेश केला आहे.

मागील काही दिवसांपासून आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ राष्ट्रवादी कॉंगेस पक्षात भाजपसह इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे इनकमिंग सुरु आहे. आरोही तळेगावकर या कॉंग्रेस पक्षाकडून दोनवेळा नगरसेवक झाल्या असून त्या विद्यमान नगरसेविका आहेत.तसेच त्यांनी बांधकाम सभापती तसेच कॉंग्रेस पक्ष गटनेते ही पदे भूषविली आहेत. मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात हा प्रवेश संपन्न झाला. यावेळी शहराध्यक्ष जीवन गायकवाड, बाळासाहेब पायगुडे, सनी पाळेकर, रिझवान शेख, अविनाश ढमढेरे, राजू तिकोने व लोणावळा शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजप व कॉंग्रेस मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने याचा लोणावळा भाजप व काँग्रेस यांना धक्का बसला असून याचा फायदा आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होणार आहे.