काँग्रेसच्या खजिनदारपदी अहमद पटेल; आनंद शर्मा विदेश समितीचे प्रमुख  

125

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – काँग्रेस पक्षाची  कमान हाती  घेतल्यानंतर  राहुल गांधी यांनी पक्षांतर्गत बदल करण्याचा सपाटा लावला आहे. त्यांनी  आज  (मंगळवारी) अनेक मोठ्या नेत्यांच्या खाद्यांवर  महत्वाची जबाबदारी टाकली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याकडे  पक्षाचे खजिनदारपद देण्यात आले आहे.

सुमारे २० वर्षे ही जबाबदारी पक्षाचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा सांभाळत होते.  दरम्यान, योगायोगाने आज पटेल यांचा वाढदिवस आहे. पक्षाकडून त्यांना वाढदिवसाची ही भेट दिल्याचे बोलले जात आहे. पटेल हे गुजरातमधून राज्यसभेवर निवडून गेले आहेत.  गांधी घराण्याचे निष्ठावंत अशी पटेल यांची ओळख आहे.

तर  आनंद शर्मा यांच्याकडे काँग्रेसच्या विदेश समितीची जबाबदारी दिली आहे. आनंद शर्मा हे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांनी मनमोहनसिंग सरकारमध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्रिपद सांभाळले आहे. लुईजिनो फलेरो यांची ईशान्य राज्यांच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. तर लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांना काँग्रेसच्या कार्यकारिणीत स्थायी सदस्यत्व दिले आहे.