काँग्रेसच्या काळात दणका मारताच कामे व्हायची; एकनाथ खडसेंचा भाजपला घरचा आहेर

1675

जळगाव, दि. १६ (पीसीबी) –  काँग्रेस सरकारच्या काळात दणका मारताच कामे व्हायची. आता आपलेच सरकार असूनही कामे होत नाहीत. रस्ते खराब झाले असून जनता आमच्याकडे विचारणा करते. सरकार काही करत नसेल तर आता आपण श्रमदानाने कामे करू. यासाठी मी हाती घमेले घेतो. हरिभाऊ आपण फावडे घ्यावे. आपण श्रमदान करून रस्ते सुधारू, अशा  शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी  महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप सरकारला घरचा आहेर दिला.

तालुक्यातील रमजीपूर येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना खडसे म्हणाले की,  आपण पालकमंत्री असताना कामे सांगण्याची गरज नव्हती. सर्व कामे वेळेत व्हायची. आता कुठलीही कामे होत नाहीत. जनता आक्रोश करत आहे. आज ना उद्या काम होतील ही भावना ठेवून पक्षाला मतदान करत आहे.

काही दिवसापूर्वी अहिरवाडी रस्त्यावरून नागरिकांनी आमदार हरिभाऊंना जाब विचारला होता. यानंतर हरिभाऊ उद्विग्न होऊन मुख्यमंत्र्यांना दोनदा-तीनदा भेटले. एकदा माझ्यासमोर पण भेटले. मात्र, सरकारकडे पैसे नसल्याचे सांगून कामे होत नाही, अशी खंत खडसे यांनी या वेळी व्यक्त केली.